Husband Wife Death Road Accident Dhanapur
गोंडपिपरी : गोंडपिपरी मार्गावरील धानापूरजवळ सोमवारी (दि. ६) सायंकाळी चारच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतकांची नावे गौतम सुरेश निमसरकर (वय ३५) व वैशाली गौतम निमसरकर (वय ३२), रा. अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली अशी आहेत. जखमी मुलीचे नाव सिया निमसरकर (वय ६) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम निमसरकर हे पत्नी वैशाली व मुलगी सिया यांना घेऊन दुचाकीने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, धानापूरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी २३२४ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैशाली आणि सिया गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सामान्य रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले असता गौतम पाठोपाठ वैशाली निमसरकर यांचा मृत्यू झाला.
अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने सहा वर्षीय सिया एका क्षणात ती पोरकी झाली आहे.तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने निमसरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.