चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी तन-मन-धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपील पालीवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर या नावाने प्रसिध्द असलेला हा जिल्हा प्राचीन काळी ‘लोकापूर’ या नावाने ओळखला जात होता. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत म्हणजे 1874 पासून हा जिल्हा चांदा या स्वतंत्र नावाने गणला जाऊ लागला. कालांतराने त्याचे नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर जानेवारी 1964 चंद्रपूर असे झाले. क्रांतीकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्याची जबाबदारी शासन, प्रशासन यांच्यासह प्रत्येक भारतीयांचीसुध्दा आहे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी परेड संचलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक, उपस्थित मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबातील वीर नारी, वीर पिता, वीर माता, शौर्य चक्र प्राप्त जवानांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात वीरपत्नी वैक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके, वीर माता पार्वती वसंत डाहुले, वीर पिता वसंतराव डाहुले, वीरमाता छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, शौर्य चक्र प्राप्त सुबेदार शंकर मेंगरे यांचा समावे होता.
लोकपयोगी योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आकापूर (ता. नागभीड), चिचबोडी (ता. सावली), माजरी (ता. भद्रावती). या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.