Murder Case Pudhari
चंद्रपूर

Chandrapur crime : पाटाळा स्मशानभूमी परिसरात युवकाचा मृतदेह आढळला; हत्येचा संशय

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळील स्मशानभूमी परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने माजरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. युवकाच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पोलिसांकडून हत्येच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त काही भाविक वर्धा नदीत स्नानासाठी गेले होते. स्नान करून परतत असताना स्मशानभूमीजवळ एका युवकाचा मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ माजरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

तपासादरम्यान मृताची ओळख आकाश बाबाराव जरीले (वय २५) रा. शेंबळ, ता. वरोरा) अशी पटली. आकाश हा कॉलवॉशरीमध्ये काम करत होता. तो काही मित्रांसोबत नदीवर गेला होता, मात्र त्यानंतर घरी परतला नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

माजरी पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT