Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime : प्रेमसंबंधातील वादातून महिलेची गळा दाबून हत्या; मृतदेह हिंगण्यात पुरला

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका महिलेच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४५ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन पुरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष साखरकर (वय ४९, रा. तुकूम, चंद्रपूर) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने १७ ऑक्टोबर रोजी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन या घटनेची माहिती दिल्यानंतर या थरारक हत्येचा उलगडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष साखरकर आणि संबंधित महिला यांच्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या संतोषने महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट व्हावा, या हेतूने त्याने मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा शिवारात नेऊन जमिनीत पुरला.

दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी आरोपी संतोष स्वतः चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना सर्व हकिगत सांगितली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक हिंगणा येथे दाखल झाले. तेथे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, पोलीस हवालदार राकेश फुकट तसेच पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे, रोशन भोईंकर आणि लीना काठवले यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT