चंद्रपूर : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईदरम्यान वरोरा शहरात एका इसमाकडून पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपंचमीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी वरोरा विभागात रवाना झाले होते. वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सत्यम टॉकीजच्या मागील वड्डार वस्ती येथे राहणारा संघपाल उर्फ संग्राम लभाने हा गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असून त्याने आपल्या घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वड्डार वस्ती येथील लभाने याच्या घरी छापा टाकून घरझडती घेतली. यावेळी घरातून एक पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जिवंत काडतुसे अवैधरित्या आढळून आली. पोलिसांनी अग्निशस्त्रासह आरोपीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ९०२/२०२६, कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.