Chandrapur Crime : वरोरा येथील आनंदवन चौकात ४ किलो १७४ ग्रॅम गांजा जप्त; दोघांना अटक! 
चंद्रपूर

Chandrapur Crime : वरोरा येथील आनंदवन चौकात ४ किलो १७४ ग्रॅम गांजा जप्त; दोघांना अटक!

नागपूरहून वरोऱ्यात विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांनी पकडला; ३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी वरोरा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. नागपूरहून वरोऱ्यात विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी वरोरा येथील आनंदवन चौकात नाकाबंदी करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ किलो १७४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, मोटारसायकल, मोबाईल आणि बॅगसह एकूण ३ लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत नागपूरहून वरोरा येथे गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी पोलिस पथकाने आनंदवन चौक परिसरात नाकाबंदी केली. यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन व्यक्तींना थांबवून पंचांसमक्ष त्यांच्या बॅगची एनडीपीएस कायद्यानुसार झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान पोलिसांना ४ किलो १७४ ग्रॅम गांजा, अंदाजे २ लाख ८ हजार ७०० रुपये किमतीचा, आढळून आला. यासोबत जुनी मोटारसायकल, खाकी रंगाची कॉलेज बॅग आणि ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३ लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रिजवान सलीम रंगरेज (२३) आणि सुभाष कालू पवार (३९), दोघेही रा. वडार मोहल्ला, वरोरा, यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सपोनि शरद भस्मे, पोउपनि मनीष तालेवार तसेच पोलिस कर्मचारी संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विशाल राजूरकर, मनोज ठाकरे आणि महेश गावतुरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT