Goa POCSO Case  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime : सातारा गावाच्या माजी सरपंचावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला कायदेशीर वळण, राजकीय दबावातून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा शिवानी वडेट्टीवार यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दहा ते बारा दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीर वळण मिळाले आहे. गजानन धनराज गुडधे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून, या घटनेमुळे चिमूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चिमूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(अ) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चर्चा मागील दहा ते बारा दिवसांपासून परिसरात सुरू होती. मात्र, पीडिता आणि तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण अधिकृतपणे समोर आले. इतके दिवस चर्चेत असलेल्या या गंभीर प्रकरणाची तक्रार उशिरा का दाखल झाली, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून, तपासातूनच त्यांचा उलगडा होणे अपेक्षित आहे.

शिवानी वडेट्टीवार यांचा राजकीय दबावाचा आरोप

या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित माजी सरपंच भाजपशी संबंधित असून, आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे मंडळ अध्यक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राजकीय दबावाचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

या आरोपांमुळे चिमूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या राजकीय दबावाच्या आरोपांची अधिकृत किंवा स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या आरोपांमागील सत्यता तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अल्पवयीन मुलीशी संबंधित हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पीडितेला न्याय मिळावा आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

या प्रकरणाचा तपास चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे करीत आहेत. तपासातून कोणती तथ्ये समोर येतात, कथित राजकीय दबावाच्या आरोपांचे सत्य काय आणि पुढील कायदेशीर कारवाई कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT