चंद्रपूर

Chandrapur Crime : पोंभूर्णा पोलिसांची मोठी कारवाई; १४.५८ लाखांच्या जप्त दारूसाठ्यावर रोड रोलर

सहा वर्षांत विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या ८५ प्रकरणांतील दारूची विल्हेवाट

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : पोंभूर्णा पोलीस स्टेशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने मोठी कारवाई करत मागील सहा वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा नष्ट केला. पोलीस स्टेशनसमोरील सिमेंट रस्त्यावर दारूच्या बाटल्या ठेवून त्यावर रोड रोलर फिरवून हा साठा नष्ट करण्यात आला.

सन २०२० ते २०२६ या कालावधीत पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एकूण ८५ गुन्ह्यांमधील जप्त दारूसाठ्याची विल्हेवाट लावण्यात आली. यात ३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या तसेच ५ पेट्या व ६ किरकोळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता. या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १४ लाख ५८ हजार ५१० रुपये इतकी होती.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार या जप्त दारूसाठ्याच्या नाशाची प्रक्रिया राबविण्यात आली. पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजुरा येथील दुय्यम निरीक्षक एस. टी. धीडसे, पोलीस कर्मचारी आणि अधिकृत पंच यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

दारूच्या बाटल्या नष्ट केल्यानंतर त्यातील काचा व रिकाम्या बाटल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला असून पारदर्शकता राखण्यासाठी कारवाईचे व्हिडिओ शूटिंग व छायाचित्रणही करण्यात आले. तसेच या कारवाईची नोंद पोंभूर्णा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार राहुल ठेंगणे आणि पोंभूर्णा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT