चंद्रपूर : क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा नफा आणि महिंद्रा XUV 300 वाहन देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या NXG कॉईन व S.D. Hub (OPC) Pvt. Ltd. या कंपनीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील वडगाव येथील रहिवासी कार्तीक रमेश खंगार (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा उघडकीस आला. खंगार हे इन्व्हेस्ट मॅनेजमेंटचे काम करीत असून त्यांना व इतर गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सी NXG कॉईन मध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आयडी तयार करून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. तसेच गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल आणि महिंद्रा XUV 300 वाहन देण्यात येईल, असे खोटे आमिष दाखवण्यात आले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांकडून एकूण १४ लाख २३ रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न देता गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(२), ६१(२), ३(५) तसेच MPID कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत असून तपासादरम्यान पोलिसांनी
रमेश सखाराम भाष्कर (वय ३३), रा. स्नेह नगर, परळी वैद्यनाथ, जि. बीड, सध्या शिमलानगर, विजापूर रोड, सोलापूर येथे वास्तव, मंगलदास तुलाराम वरखडे (वय ४९), रा. हनुमान मंदिराजवळ, लोहारा, ता. जि. चंद्रपूर या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी गुंतवणूकदार समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ तसेच महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी NXG कॉईन व S.D. Hub (OPC) Pvt. Ltd. या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे येऊन वैध कागदपत्रांसह ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज (फॉर्म) भरावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे तसेच त्यांच्या पथकातील पोउपनि नानेश्वर श्रीरामे आणि पोलीस हवालदार प्रभाकर तलांडे हे तपास करीत आहेत. पोलिसांनी गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे की, ज्यांनी NXG कॉईन किंवा संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून द्यावा, जेणेकरून त्यांच्या ठेवी परत मिळविण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल.