चंद्रपूर : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोबत नेऊन तिची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरात घडला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतल्याने ती जखमी झाली. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा शेगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत शोध घेत त्याला ताब्यात घेतले. गणेश बाळुराम कुमावत (३४), रा. बासडी खुर्द, जि. जयपूर (राजस्थान), सध्या रा. बोर्डा, ता. वरोरा, असे आरोपीचे नाव आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. काही अंतर गेल्यानंतर त्याने मुलीची छेड काढल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतली. यात ती जखमी झाली. या प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परिसरातील माहिती संकलित करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर २४ तासांच्या आत गणेश कुमावत याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सफौ दिलीप सुर, पोलीस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार व प्रशांत गिरडकर यांच्या पथकाने केली.