Chandrapur Crime file photo
चंद्रपूर

Chandrapur Crime : लैंगिक छळाच्या प्रकरणात राज्यमंत्र्यांचा बॉडीगार्ड चंद्रपुरातून अटक!

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : लैंगिक छळाच्या प्रकरणात फरार असलेला राज्यमंत्र्यांचा बॉडीगार्ड अजय सदाशिव सलामे (३८) याला रामटेक पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. अटकेनंतर उशिरा रात्री त्याला रामटेक येथे आणण्यात आले. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सलामे याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

रामटेक येथील एका महिलेने अजय सलामे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीचे अन्य एका महिलेसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला.

मात्र, त्यानंतरही सलामे याने पीडितेवर संपर्क कायम ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीच्या संपर्कातील एका महिला वकिलीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. संबंधित वकिलाने पीडितेच्या मुलांना इजा करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. रामटेक पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अजय सलामे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच अजय सलामे फरार झाला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने अग्रिम जामिनासाठीही प्रयत्न केल्याचे समोर आले. दरम्यान, रामटेक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. तांत्रिक तपासादरम्यान तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सलामे चंद्रपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चंद्रपुरात कारवाई करून त्याला अटक केली. या प्रकरणातील सहआरोपी महिला वकिलीस अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, अजय सलामे यांच्या पत्नीनेही २४ ऑगस्ट रोजी पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याआधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पत्नीने पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

बॉडीगार्ड निलंबित; विभागीय चौकशी सुरू

प्रकरण दाखल झाल्यानंतर पोलीस विभागाने अजय सलामे याला निलंबित केले आहे. त्याच्याविरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी रामटेक पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT