चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बाबुपेठ परिसरातील एका घरावर धाड टाकून ‘तीन पत्ती’ जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १० जणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत बाबुपेठ येथील आंबेडकर चौक परिसरात एका घरात तीन पत्ती जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेऊन पंचांच्या उपस्थितीत कारवाईची तयारी केली. त्यानंतर संबंधित घरावर अचानक छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान घराच्या पहिल्या खोलीत काही जण गोलाकार बसून ५२ पत्त्यांच्या साहाय्याने पैशांची बाजी लावत ‘तीन पत्ती’ जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून एकूण १० जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुनवंत सोमाजी आवळे, रॉयल शैलेंद्र पाटीला, सचिन प्रल्हाद गोवर्धन, अतुल धनराज ढोक, शामराव प्रल्हाद पिपरे, सचिन मिलिंद मानकर, प्रफुल ज्ञानबा भागवत, सुधीर हिरालाल जांभुळकर, ब्रम्हेदेव मोहन गोरी आणि अविनाश संजय वासेकर यांचा समावेश आहे.
सदर प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.