चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि बल्लारपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंध्रप्रदेशातील एका सराईत आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडीचे सहा आणि वाहनचोरीचे तीन असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले असून, १४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
दरम्यान, १९ मे २०२६ रोजी बल्लारपूर येथील गोरक्षण वॉर्डात राहणाऱ्या रजिता परमेश्वर सिंघाराव या घराला कुलूप लावून कामावर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल १२ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन ८ जुलै रोजी चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला (वय ३२) याला शिताफीने अटक केली. या कारवाईत तेलंगणा पोलिस दलातील नरेश दत्त यांनी आरोपीची ओळख पटविण्यास मोलाची मदत केली.
तपासात आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध आंध्रप्रदेशात ४१ आणि तेलंगणात ६ असे एकूण ४७ घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस तपासात आरोपीची चोरी करण्याची पद्धतही समोर आली आहे. आरोपी रेल्वेने विनातिकीट चंद्रपूर जिल्ह्यात येत असे. स्वतःची ओळख लपविण्यासाठी तो नेहमी टोपी, मास्क आणि पाठीवर कॉलेज बॅग घेऊन फिरत असे. रेल्वे स्थानक परिसरातून प्रथम मोटारसायकल चोरी करून त्याच वाहनाच्या साहाय्याने बंद घरे शोधून घरफोडी करत असे. चोरीनंतर मोटारसायकल पुन्हा रेल्वे स्थानकाजवळ सोडून रेल्वेने आंध्रप्रदेशात पसार होत असल्याचे तपासात उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी तीन चोरीच्या दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये हिरो होंडा पॅशन प्रो, हिरो होंडा स्प्लेंडर, डेस्टिनी कंपनीची मोपेड तसेच सुमारे ३.२० लाख रुपयांचे सोन्याचे आणि १.२५ लाख रुपयांचे चांदीचे दागिने समाविष्ट आहेत. सोन्याचे दागिने राजमुंद्री येथील एका गोल्ड कंपनीकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीच्या अटकेमुळे बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे सहा आणि मोटारसायकल चोरीचे तीन असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये बल्लारपूर पोलीस ठाण्यातील तीन, राजुरा पोलीस ठाण्यातील चार, चंद्रपूर शहरातील एक आणि रामनगर पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्याचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूरचे ठाणेदार बिपीन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, सायबर सेलचे बलराम झाडोकार, उपनिरीक्षक विक्की लोखंडे तसेच एलसीबी आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.