Chandrapur Crime  
चंद्रपूर

Chandrapur Crime | अवैधरित्या देशी-विदेशी दारू वाहतूक : १२ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंडपिपरी पोलिसांची कारवाई : दारू डुप्लिकेट असल्याचे निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध  मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीतून एकूण १२ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सदर दारू डुप्लिकेट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. चंद्रपूर–आष्टी मार्गावरून महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक MH30-AF-4656) या वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डांबर प्लांटजवळ नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदीदरम्यान संबंधित स्कॉर्पिओ वाहन पोलिसांच्या हाती लागले. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने वाहन नालीवरून कापसाच्या शेतात  पळ काढला. वाहनाची  तपासणी केल्यानंतर आत देशी दारू (संत्रा ९० एम.एल.)च्या ५१ पेट्या, किंमत २,०४,००० रुपये आणि रॉयल स्टॅग (१८० एम.एल.)च्या ५ पेट्या, किंमत ६२,४०० रुपये, अशी एकूण २,६६,४०० रुपयांची अवैध दारू आढळली.

दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन (अंदाजे किंमत १० लाख रुपये) तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकत्रित १२,७६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक पडताळणीत दारू डुप्लिकेट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि रमेश हत्तीगोटे, पोअं वंदीराम पाल, अतुल तोडास, रुपती गोडसेलवार, प्रशांत नैताम यांचा सहभाग होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT