File Photo
चंद्रपूर

Chandrapur Crime : चंद्रपुरात गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला; २१ लाखांचा मुद्देमाल लंपास

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरा जवळील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'एचपी' गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रक आणि गॅस सिलिंडरसह एकूण २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, पडोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधी वॉर्ड (जेल रोड, चंद्रपूर) येथील रहिवासी वैभव विनोद खांडरे (वय ४२) हे गेल्या चार वर्षांपासून एलपीजी गॅस सिलिंडर वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचे १२ ट्रक असून, ते वरोरा येथील श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टिंग कंपनीमार्फत 'एचपी' गॅस सिलिंडरची वाहतूक करतात.

रविवारी (दि. १२) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास, अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. MH 34 BG 1600) एमआयडीसी खुटाळा येथील 'एचपी' गॅस बॉटलिंग प्रकल्पातून गॅस भरून कंपनीसमोरील रस्त्यावर उभा करण्यात आला होता. त्यानंतर रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास चालक राज नागम्मवार यांनी हा ट्रक पार्किंगच्या ठिकाणी नसल्याची माहिती मालक वैभव खांडरे यांना दूरध्वनीवरून दिली.

चोरीची माहिती मिळताच खांडरे यांनी तत्काळ परिसरात ट्रकचा शोध घेतला; मात्र ट्रक आणि त्यातील मुद्देमाल कुठेही आढळून आला नाही. चोरीला गेलेल्या ट्रकमध्ये अंदाजे १० लाख ५९ हजार रुपये किमतीचे ३३२ घरगुती (१४.२ किलो) आणि अंदाजे ५५ हजार रुपये किमतीचे १० व्यावसायिक (१९ किलो) गॅसने भरलेले सिलिंडर होते. याशिवाय अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

या प्रकरणी वैभव खांडरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पडोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT