चंद्रपूर : चंद्रपूर शहरात सतत घडणाऱ्या वाहन व देवस्थानातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीनंतर आरोपीस ताब्यात घेऊन झालेल्या तपासात विविध ठिकाणातील ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक शहरात गस्त घालीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी प्रतीक उर्फ राहुल वनराज झाडे (वय ३५) रा. महाकाली कॉलरी, ह.मु. छोटा नागपूर, चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडून कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याने विविध देवस्थान व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीने हनुमान मंदिर, दादमहल वार्ड, लक्ष्मीनारायण मंदिर, संत अंद्रिया चर्च, जयंत टॉकीज परिसर, दिशाभूमी बौद्ध विहार, डॉ. आंबेडकर कॉलेज परिसर या शिवाय रामनगर व इमामवाडा (नागपूर) हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हेही आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण ०४ अवजड दुचाकी आणि देवस्थान चोरीसंबंधी ०४ असे मिळून ०८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण 5,30,000 किमतीचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये चार मोटारसायकल व तिन मोबाईलचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत करण्यात आलेल्या पथकामध्ये पो उपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बादामवार यांचा समावेश होता. या अटक व जप्तीतून अलीकडील चोरी मालिका उकलल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.