Bribe Case Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime : बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजारांची लाच; कोरपण्यातील कृषी सहायक ACBच्या जाळ्यात

५५ हजारांची केली होती मागणी; तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कोरपणा येथील कृषी सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वर्धा पथकाने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी रंगेहात पकडले. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहायकाचे नाव असून, या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

हरी उदगीरे हे कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदाराने बंधाऱ्याचे काम केले होते. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी उदगीरे यांनी सुरुवातीला ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती; याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत उदगीरे यांनी ४० हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे मान्य केले.

तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना उदगीरे यांना सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी रंगेहात पकडण्यात आले. लाचेची रक्कम ५०० रुपयांच्या ८० नोटांच्या स्वरूपात होती.

कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाइल फोन आणि ५९५ रुपये रोख जप्त करण्यात आले. आरोपीच्या घराची झडती सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक केदार करत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे तसेच पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे आणि विष्णू काळुसे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT