Theft Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Theft : बांधकाम साहित्य चोरीप्रकरणी आरोपी अटकेत; ६ तासांत ७.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुल तालुक्यातील नांदगाव येथील आयएसपी कंपनीच्या गोडाऊनमधून लोखंडी सळई व सिमेंटची चोरी करणाऱ्या आरोपीस मुल पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : मुल तालुक्यातील नांदगाव येथील आयएसपी कंपनीच्या गोडाऊनमधून लोखंडी सळई व सिमेंटची चोरी करणाऱ्या आरोपीस मुल पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख ८२ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० वाजण्याच्या सुमारास श्रीकांत कामीडवार याने स्वतःच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साहाय्याने मौजा नांदगाव येथील आयएसपी कंपनीच्या गोडाऊनमध्ये प्रवेश केला. कंपनीच्या मालकास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी केली.

चोरी करण्यात आलेल्या साहित्यामध्ये ७० बंडल (७०० बार) १० एमएम लोखंडी सळई (वजन ५.२०८ टन, किंमत २ लाख ६७ हजार ८५३ रुपये) तसेच अंबुजा कंपनीच्या ५० सिमेंट बॅग (किंमत १५ हजार रुपये) असा एकूण २ लाख ८२ हजार ८५३ रुपयांचा माल समाविष्ट होता.

फिर्यादीच्या तक्रारीवरून मुल पोलीस ठाण्यात अप. क्र. २४८/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. अवघ्या सहा तासांत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाकडून पोलीस कोठडी (पीसीआर) मिळवून आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ७ लाख ८२ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सबोध वंजारी, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, इंदल राठोड, सुनिल कुळमेथे तसेच गणेश मेश्राम, संदिप चौधरी, नरेश कोडापे, वेदनाथ करंबे, शंकर बोरसरे आणि दिलीप आदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT