चंद्रपूर : काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने घुग्गुस शहरात खळबळ उडाली. ही घटना आज रविवारी रात्री (9 मार्च) ला घडली. हल्ला झाला त्यावेळी रेड्डी घरी उपस्थित होते. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासात असे दिसून आले की गोळीबाराच्या घटनेनंतर रेड्डी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गोळीबारात वापरलेले काडतूस आढळून आले आहे.या भ्याड हल्ल्याची माहिती घुग्घुस मध्ये पसरताच राजु रेड्डी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर जमली, ज्यामुळे वातावरण आणखी तापले. पोलिसांनी रेड्डी यांच्या घरा सभोवती तगडा पोलीस बंदोबस्त त्याला तैनात केला आहे.
या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. हा हल्ला एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे रेड्डी यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने करीत आहेत.
या घटनेनंतर, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत आणि हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला आहे की इतर काही कारणांमुळे झाला आहे याचा तपास करीत आहेत.
या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. घटनांमुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना अफवांवर लक्ष देवू नये, पोलिस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.