Chandrapur Congress Dispute
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दोन गटांत विभागलेल्या काँग्रेसमधील वाद आणि अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला आहे. स्थानिक महानगरपालिकेतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांना, विशेषतः खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्याने या वादाला गंभीर वळण मिळाले आहे.
महापालिकेतील काँग्रेसचे वादग्रस्त गटनेते राजेश अडूर यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत नागपूर विभागीय सहआयुक्त रवींद्र भेल यांनी या नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस मिळालेल्या नगरसेवकांना २२ जुलै रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक असून ते खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात विभागले गेले आहेत. वडेट्टीवार गटाकडे ११, तर धानोरकर गटाकडे १६ नगरसेवक असल्याचे मानले जाते.
महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या निवडीवरून यापूर्वीच दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. वडेट्टीवार समर्थक नगरसेवक राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली होती. मात्र, ही नियुक्ती खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांना मान्य नव्हती. त्यांनी अडूर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून हटविण्याचा प्रयत्न केला होता.
नागपूर विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या या अविश्वास प्रस्तावानंतर धानोरकर समर्थक नगरसेवकांनी काँग्रेस गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले यांची नियुक्ती करण्यात यश मिळवले होते. दरम्यान, गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजेश अडूर यांनी १५ जून रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला धानोरकर समर्थक १६ नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. याच आधारावर अडूर यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता कायदा, १९८६ अंतर्गत या नगरसेवकांविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती.
या याचिकेच्या आधारे विभागीय आयुक्तांनी आता काँग्रेसच्या १६ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित नगरसेवकांना २२ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता नागपूर येथे होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सुरेंद्र अडबाले, संगीता भोयर, संगीता अमृतकर, राहुल घोटेकर, वैशाली महाडोळे, वणश्री मेश्राम, राहुल चौधरी, सुनंदा धोबे, रामनरेश यादव, शाहिदा ताजू शेख, अजय बल्की, सुनील खंडेलवाल, आकाश मानकर, महानंदा वालके, करुणा चालखुरे आणि शीला सिडाम यांचा समावेश आहे. याशिवाय महिला नगरसेविका वणश्री केशव मेश्राम यांच्या अपात्रतेसाठीही राजेश अडूर यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.