Vinay Gauda Best Chandrapur district Collector
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची घोषणा केली होती. या 100 दिवसांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग प्रमुखांची आज 1 मे महाराष्ट्र दिनी घोषणा करण्यात आली. यामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी ठरले आहे.
विनय गौडा हे ऑक्टोबर 2022 पासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर असून ते 2015 बॅच चे IAS आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या या नामांकनावर विनय गौडा यांनी आनंद व्यक्त केला असून याचे श्रेय संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.
त्यांच्या मते जिल्ह्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे, वेळेत लोकांना सेवा उपलब्ध करून देणे आणि कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर या गोष्टींवर त्यांनी शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात विशेष लक्ष दिले होते. त्यामुळेच चंद्रपूर जिल्हा हा राज्यात सरस ठरला आहे.