चंद्रपूर

Chandrapur News : जिल्‍हाधिकारी, सीईओंनी केले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन

जिवती तालुक्यात आरोग्य, शिक्षण व कामांची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Collector Vasumana Pant Jivati visit

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी जिवती तालुक्याचा दौरा करून आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास तसेच आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे माता सखींसोबत संवाद साधला व शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले.

‘माता सखी’ कार्यक्रमाचा आढावा

दौऱ्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी पंत व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंह यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे भेट देऊन ‘माता सखी’ कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध आरोग्य सुविधा व सेवांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माता सखींसोबत संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच माता व बाल आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

दोन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पालकांशी साधला संवाद

शेणगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. विद्यार्थी शाळेत न जाण्यामागील कारणे जाणून घेत पालकांना मुलांच्या नियमित शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यांच्या पालकांशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधित शिक्षकांना देण्यात आल्या.

लांबोरी आरोग्‍य उपक्रेंद्राचीही पाहणी

शेणगाव येथे निर्माणाधीन सुसज्ज वाचनालयालाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच जिल्हा परिषद मॉडेल स्कूलच्या इमारतीची पाहणी करून उपलब्ध सुविधा व सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. यानंतर टाटा मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी लांबोरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. येथे आयोजित आरोग्य शिबिराची पाहणी करून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. लांबोरी येथील आरोग्य उपकेंद्रालाही भेट देऊन उपलब्ध आरोग्य सुविधा तसेच स्थानिक स्तरावरील समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी सूचना

दौऱ्याच्या शेवटी पंचायत समिती, जिवती येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासाशी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर, गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT