चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतपिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि.९) बल्लारपूर तालुक्यातील आष्टी रिठ व पळसगाव या गावांना भेट दिली.
यावेळी त्यांनी भात व कापूस पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्राचे ग्राउंड ट्रुथिंग (प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी) तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
बल्लारपूर तालुक्यात पावसाच्या खंडामुळे भात आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंत यांनी आष्टी रिठ व पळसगाव येथील विजय बालाजी भोयर, रामदास भोयर, मुकुंदा मडावी व मारुती मडावी यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून संवाद साधला. पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम, उत्पादनात होणारी संभाव्य घट, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक व वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक असून, त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ग्राउंड ट्रुथिंगच्या कामात विलंब नको
दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने महसूल, कृषी व जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बल्लारपूर तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करून पिकांच्या नुकसानीचा अहवाल विनाविलंब सादर करावा. या अहवालाच्या आधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविणे शक्य होणार असल्याने ग्राउंड ट्रुथिंगच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.
केशर आंबा फळबाग लागवड क्षेत्राला भेट
विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना व जिल्हा खनिज निधी अभिसरण अंतर्गत ग्राम पंचायत कोर्टीमक्ता येथील केशर आंबा फळबाग लागवड करण्यात आलेल्या क्षेत्राला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भेट दिली.
या पाहणी दौऱ्यात बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विलास कुमरे, पळसगावच्या सरपंच संगिता सोयाम, वासुदेव मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.