Chindhimal Paddy Crop Inspection
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मौजा चिंधिमाल येथे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शेतकरी पांडुरंग मेश्राम यांच्या शेताला भेट देत धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी 'श्री' (SRI) पद्धतीसह पारंपरिक लागवड आणि डायरेक्ट सीडेड राईस (DSR) या लागवड पद्धतींचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी धान पिकाची वाढ, पिकांची स्थिती आणि विविध लागवड पद्धतींचे परिणाम जाणून घेतले. उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व सुधारित तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
या दौऱ्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल गव्हारे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, अपर तहसीलदार एस. कुंटे व शेबटवार, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील झंझाड, उपकृषी अधिकारी एस. ए. पाकमोडे व जी. टेंभुर्णे, मंडळ अधिकारी एस. बोडावार आदी अधिकारी उपस्थित होते.
धान लागवडीतील विविध तांत्रिक बाबींचे सादरीकरण सहाय्यक कृषी अधिकारी सी. एस. दाडगे यांनी केले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी रमेश कोल्हे, कु. पूजा मदनकर आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी या पाहणी कार्यक्रमात सहभागी झाले.