Woman killed in tiger attack Chandrapur
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी गावात आज गुरुवारी (18 सप्टेंबर) ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. विद्या कैलास मसराम (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाडीला घेराव घालत मागण्या केल्या. अखेर वनविभागाने मदत, नोकरी आणि वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
लावारी येथील कैलास मसराम यांनी जंगलालगत असलेली शेती ठेक्याने घेतली होती. दोन दिवसांपासून त्यांच्या शेतात धान निंदणाचे काम सुरू होते. आज गुरुवारी सकाळी सहा महिला निंदणासाठी शेतात गेल्या. त्यातील पाच महिला समोरील बांधीत काम करीत होत्या तर मृतक विद्या मसराम मागील बांधीत निंदण करत होती. अचानक वाघाने त्यांच्या वर झडप घालत त्यांना ठार केले व जवळपास 200 फुट अंतरावर फरफटत नेले. समोरील महिलांना घटनेची माहिती न लागल्याने काही काळ शोधाशोध सुरू होती. दरम्यान, पती कैलास शेतात आले असता त्यांनी पत्नीचा शोध घेतला आणि हा प्रकार उघकीस आला.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी जमले. माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, चिमूर येथे पाठविला, परंतु त्यानंतर ग्रामस्थांनी शंकरपूर-भिसी रस्त्यावर वनविभागाच्या गाडीला घेराव घातला. मृतकाच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची भरपाई व पन्नास हजार रुपयांचा तात्काळ निधी देण्यात यावा, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच तसेच वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आदी मागण्या केल्या.मागण्या मान्य होईपर्यंत वाहन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
तणाव वाढत असताना गावकऱ्यांनी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकीची तोडफोड केली. बोरकर हे जनतेला नाहक त्रास देतात, असा आरोप करून ग्रामस्थांनी त्यांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. परिस्थिती गंभीर होत असल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांच्या नेतृत्वाखालील वनविभाग पथकाने व उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे आदी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. 50 हजार रुपये नगद मदत, 10 हजार रुपयांचा चेक, वाघाचा बंदोबस्त, व कुटुंबातील सदस्याला नोकरी तसेच वनरक्षक बोरकर यांची बदली केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तणाव निवळला.
गावकऱ्यांच्या वतीने सरपंच अरविंद राऊत, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, जीवन रंदये यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार