चंद्रपूर : चिमुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत शेडेगाव येथे नव्याने पर्यटन सफारी गेट तयार करण्यात आले. आज पासून या प्रवेशद्वारातून सफारीला सुरुवात झाली आहे. आज शनिवारी आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते उद्घाटन पार पाडले.
चिमुर खडसंगी या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ व इतर वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याने वनविभागाने त्या क्षेत्रात पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. शेडेगाव व शिवापुर बंदर या क्षेत्रातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्याकरीता व सोबतच पर्यटकांना पर्यटनाची उत्तम संधी उपलब्ध होण्याकरीता चिमुर व खडसंगी उपक्षेत्रातील वनक्षेत्रात सफारी रस्ते तयार करण्यात आले. कक्ष क्रमांक 15 मध्ये निरीक्षण कुटी तयार करण्यात आली. वन व वन्यजीव संरक्षणासोबतच लोकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा या उद्देशाने 31 किलोमिटर पर्यटन रस्ते तयार करण्यात आले. हे पर्यटन रस्ते कक्ष क्रमांक 27, 371, 368, 355, 357, 15 मधुन गेलेले आहेत. या रस्त्यानेच पर्यटन सफारी होणार आहे.
आज शनिवारी आ.किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते पर्यटन गेटचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंत्तर सहा जिप्सीद्वारे परिसरातील, गावातील लोकांना मोफत सफारी करण्यात आली. या पर्यटन सफारी गेटमुळे लगतच्या गावातील लोकांना गाईड, जिप्सी ड्रायव्हर व जिप्सीला रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या पर्यटन गेटचे बुकींग ऑफलाईनच आहे.
यावेळी चंद्रपुर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर (भा.व.से.), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, भा.व.से., ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, चिमुर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र मेश्राम राऊंड ऑफीसर चिमुर, उत्तम घुगरे राऊंड ऑफीसर,संतोष औतकर राऊंड ऑफीसर, उध्दव लोखंडे राऊंड ऑफीसर, रामदास नैताम राऊंड ऑफीसर, अक्षय मेश्राम वनरक्षक, रुपेश चौधरी वनरक्षक, रुपेश केदार वनरक्षक व समस्त वनकर्मचारी यांनी परिश्रम घेतले.