Chimur Forest Range Bear Death
चंद्रपूर: वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने अस्वल आणि तिच्या अवघ्या चार महिन्यांच्या पिलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२४) चिमूर वनपरिक्षेत्रातील कवडशी शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेत अन्य दोन पिले झाडावर चढल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित शेतमालकाविरुद्ध वनविभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, तळोधी नाईक येथील रहिवासी फकीरा रणदिवे यांनी चिमूर येथील यादव गोठे यांचे कवडशी येथील शेत भाडेतत्त्वावर घेतले होते. या शेतात कापूस व धानाची लागवड करण्यात आली असून, पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तार लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. याच विद्युत प्रवाहित तारेच्या संपर्कात आल्याने अस्वल आणि तिच्या चार महिन्यांच्या पिलाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अस्वलाची दोन पिले झाडावर चढल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके फोडून या दोन्ही पिलांना झाडावरून सुरक्षितपणे खाली उतरविले. यावेळी परिसराची पाहणी करताना वनकर्मचाऱ्यांना अस्वल आणि तिचे चार महिन्यांचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, क्षेत्रपाल निशा राठोड तसेच महावितरणचे अभियंता सुमित दडमल यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत अस्वल व पिल्लाला शवविच्छेदनासाठी खडसंगी येथे पाठविण्यात आले आहे.