The lake at Chichapalli burst
चिचपल्ली येथील तलाव फुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले. Pudhari News Network
चंद्रपूर

चंद्रपूर : चिचपल्लीचा तलाव फुटला; जनावरे वाहून गेली, ८० शेळ्यांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्हात मुसळधार पाऊस सुरू असून चिचपल्ली गावातील लहान तलाव फुटल्याने सुमारे २०० कुटुंबांचे नुकसान झाले आहे. साखर झोपेतच पाणी गावात शिरल्याने नागरिकांना आपले संसार उपयोगी साहित्य वाचविता आले नाही. ७० ते ८० शेळ्यांचा या पुरात मृत्यू झाला असून अनेक जनावरे वाहून गेली आहेत. क्षतीग्रस्त कुटुंबीयांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य नातेवाईकांकडे आश्रयास ठेवण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर चिचपल्ली गाव आहे. या गावाला दोन तलाव आहेत. त्यापैकी एक लहान तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव रविवारी (दि.२१) पहाटे साडेचार वाजता फुटला. तलाव फार जुना असल्याने तलावाची पाळ कमकुवत झालेली होती. शिवाय वनविभागाने जंगलात एक बंधारा बांधल्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी येथील तलावात मोठ्या प्रमाणात येत होते. चिचपल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे या तलावाची पाळ फुटली.  तलावाच्या खालच्या बाजूला दोनशे कुंटुब वास्तव्यास असल्याने या गावात तलावाचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांच्या संसारउपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात पाण्याची पातळी कमरेच्या वर गेल्यामुळे सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. तर काही जनावरे वाहून गेली.

२०१० मध्येही फुटला होता लहान तलाव

चिचपल्ली गावात फार जुना असलेला लहान तलाव २०१० सालीही फुटलेला होता. त्यानंतर २०२२ मध्ये हा तलाव फुटू शकतो, अशी शक्यता वर्तवून या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली होती. त्यावेळी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन तलावाचे पाहणी केली होती. मात्र त्यानंतर तलावाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे आज कायम आहे.

पिकांचे अतोनात नुकसान

लहान तलाव फुटल्यामुळे चिचपल्ली परिसरातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. काही भागात लागवड करण्यात आलेले  कापूस पीक वाहून गेले असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

SCROLL FOR NEXT