Chandrapur Bus Stand Unhygienic Conditions Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Bus Stand | १४ कोटींच्या बसस्थानकात दुर्गंधीचे साम्राज्य; स्वच्छतेच्या नावावर प्रवाशांकडून दोन रुपये वसुली

खासगी कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारावर युवासेना आक्रमक; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Bus Stand Unhygienic Conditions

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या उभारणीवर तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एवढा मोठा खर्च करून उभारलेल्या या बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता व देखभालीचे कंत्राट स्मार्ट सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडे असतानाही नियमित स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, तिकीट काढताना स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांकडून दोन रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याची माहिती आहे. असे असतानाही प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी ९ नोव्हेंबर रोजी आगार व्यवस्थापकांना निवेदन देत जाब विचारला. आठ दिवसांत स्वच्छतेची व्यवस्था सुधारली नाही, तर बसस्थानकात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

चंद्रपूर बसस्थानक हे दररोज हजारो प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथे प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधाही व्यवस्थित मिळत नसल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये घाण साचली असून, असह्य दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅडसारख्या आवश्यक सुविधांचाही अभाव असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

युवासेनेने दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत बसस्थानकाची स्वच्छता समाधानकारक पद्धतीने केली जात होती. मात्र, स्वच्छता व देखभालीचे काम खासगी कंपनीकडे सोपविल्यानंतर स्वच्छतेच्या दर्जात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या कामाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बसस्थानकातील संपूर्ण परिसराची तातडीने सखोल स्वच्छता करावी, सर्व स्वच्छतागृहांची दिवसातून अनेक वेळा नियमित स्वच्छता करावी, महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅडची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच स्वच्छता व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवावी, अशा प्रमुख मागण्या युवासेनेने केल्या आहेत.

प्रवाशांकडून स्वच्छतेच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असताना प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव का, असा सवाल उपस्थित करत विक्रांत सहारे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आठ दिवसांची मुदत देऊनही सुधारणा न झाल्यास युवासेनेच्या वतीने बसस्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT