बसचालकाला आला मिरगीचा झटका : चिमूर आगाराची बस खड्डयात कोसळली, वाहक ठार  Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Bus Accident | बसचालकाला आला मिरगीचा झटका : चिमूर आगाराची बस खड्डयात कोसळली, वाहक ठार

१३ प्रवासी जखमी : चारगाव (बु) परिसरातील पुलाजवळ अपघात : शेतकऱ्यांच्या मदतीने जखमींना वाचवण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर आगाराची चंद्रपूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची क्र. एम एच 40 एक्यू 6181 ही बस आज मंगळवारी दुपारी वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ ई वर चारगाव (बु) येथील पुलाजवळ अचानक पलटी झाली. या भीषण अपघातात एका वाहकाचा मृत्यू झाला असून, सुमारे १३ प्रवासी जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चिमूरहून चंद्रपूरकडे निघालेली बस चारगाव (बु) येथील नदीपात्राजवळून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेली. अपघात घडताच आजुबाजूच्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी व शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या धैर्याने जखमींना बाहेर काढले आणि तत्काळ मदतकार्य सुरू केले.

घटनेनंतर जखमींना खाजगी वाहनांनी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात बसचा वाहक सुरेश भटाळकर गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसचालक सुनील पुसनाके यांना मिरगीचा झटका येत असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बसमध्ये एकूण सुमारे ३५ प्रवासी होते, यापैकी १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरकडे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली या अपघातामुळे चिमूर-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून, वाहन तांत्रिक बिघाडामुळे पलटी झाला की अन्य कारणामुळे, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT