चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पोंभुर्णा येथे कार्यरत असलेल्या तासिका तत्त्वावरील महिला निदेशकाच्या पाच महिन्यांच्या मानधनाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात संस्थेच्या महिला प्राचार्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी (२३ नोव्हेंबर) पोंभुर्णा येथील शासकीय आयटीआयमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला (वय ३१) या पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्या वायरमन विषयाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देतात. त्यांना सैद्धांतिक विषयासाठी प्रतितास २५० रुपये, तर प्रात्यक्षिकासाठी प्रतितास १२५ रुपये मानधन मिळते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे एकत्रित मानधन नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले होते.
हे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात संस्थेच्या प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे (वय ५५) यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलिक (वय ४७) यांच्यामार्फत ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित महिलेने २१ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर एसीबीकडे केली. तक्रारीच्या अनुषंगाने २२ नोव्हेंबर रोजी एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली. यावेळी प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम २३ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच लिपिक मलिक यांनीही प्राचार्यांच्या लाच मागणीला प्रोत्साहन देत रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने पोंभुर्णा येथील शासकीय आयटीआयमध्ये सापळा रचला. तक्रारदार महिलेने पंचांसमक्ष २५ हजार रुपये नरेंद्र मलिक यांच्याकडे दिले. ही लाचरक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार यांच्या पर्यवेक्षणात पथकाने ही मोहीम राबविली. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.