Bribe Case Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Bribe News : केवळ ८१ रुपयांच्या लाचेचा मोह नडला, सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात!

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी घेतली लाच! गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये कारवाई; १५० रुपयांची रक्कम स्वीकारताना सचिन खैरे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर :  उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय शुल्कापेक्षा अतिरिक्त रकमेची मागणी करून ८१ रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कोरपना तालुक्यातील गडचांदुर येथील सरकारमान्य सेतू केंद्र चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेस या सेतू केंद्रात करण्यात आली.

सचिन रामचंद्र खैरे (वय ४०), रा. गडचांदूर, वॉर्ड क्रमांक ३, ता. कोरपना, जि. चंद्रपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराला उत्पन्नाचा दाखला काढायचा होता. त्यासाठी शासनाने निश्चित केलेले ६९ रुपये शुल्क असताना आरोपी खैरे यांनी एकूण २०० रुपयांची मागणी केली. यामध्ये शासकीय शुल्काव्यतिरिक्त १३१ रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार पंचासह गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये गेले. त्यावेळी आरोपीने ६९ रुपये शासकीय शुल्कासह २०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती शासकीय शुल्कासह एकूण १५० रुपये स्वीकारण्याचे आरोपीने पंचांसमक्ष मान्य केले.

यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपी सचिन खैरे याने ६९ रुपये शासकीय शुल्क आणि ८१ रुपये लाचेची रक्कम, अशी एकूण १५० रुपये रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाणे, जिल्हा चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार यांनी केले. कारवाईत हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम व संदीप कवरासे यांच्यासह एसीबी चंद्रपूरच्या पथकाने सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT