चंद्रपूर : लक्कडकोट येथील आरटीओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी यशस्वी सापळा कारवाई करत ५०० रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. या प्रकरणात संबंधित मोटार वाहन निरीक्षकाच्या संगनमताचाही आरोप असून दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
तक्रारदार हा ४७ वर्षीय ट्रकचालक असून, त्याच्या मालवाहू वाहनाला चेकपोस्टवरून सोडण्यासाठी ‘एन्ट्री’च्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी होत असल्याची तक्रार त्याने २० मार्च रोजी नागपूर येथील ACB कार्यालयात दिली होती. या तक्रारीची पडताळणी २३ मार्च रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित एजंटने ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ACB पथकाने सापळा रचला. आज सोमवारी (२३ मार्च) लक्कडकोट चेकपोस्टवर आरोपी विलास देशमुख या खासगी एजंटने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारली. या गैरप्रकाराला मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांनी प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले.
दरम्यान, सापळा कारवाईची चाहूल लागताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली असता ‘एन्ट्री’च्या नावाखाली जमा केलेली ७,१२० रुपयांची रोकड, सापळ्यातील ५०० रुपये व आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७(अ) व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली ACB नागपूर पथकाने केली.
सापळा कारवाईची ठळक मुद्दे
▪️ तक्रारदार : ४७ वर्षीय ट्रकचालक
▪️ लाच रक्कम : ५०० रुपये
▪️ ठिकाण : लक्कडकोट आरटीओ चेकपोस्ट
▪️ जप्ती : ७,१२० रु. रोख + मोबाईल
▪️ आरोपी : एजंट व मोटार वाहन निरीक्षक
▪️ स्थिती : दोन्ही आरोपी फरार
कारवाई करणारे पथक
अनिल जिट्टावार पोलीस उपअधीक्षक (ACB नागपूर), ️ जितेंद्र वैरागडे – पोलीस निरीक्षक, ️ विलीन तांबडे, सोमेश्वर वाईलकर, ️ प्रफुल भातूलकर, स्वाती हिंडोरिया, तपास : नीलेश उरकुडे, पोलीस निरीक्षक एसीबी चंद्रपूर)