चंद्रपूर : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वर्धा पथकाने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी रंगेहात पकडले. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५), असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव असून, या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
हरी उदगीरे हे कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदाराने बंधाऱ्याचे काम केले होते. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी उदगीरे यांनी सुरुवातीला ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे त्यांनी मान्य केले.
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. तडजोडीनुसार ठरलेली ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना उदगीरे यांना सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी रंगेहात पकडण्यात आले. लाचेची रक्कम ५०० रुपयांच्या ८० नोटांच्या स्वरूपात होती.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि ५९५ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे तसेच पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे आणि विष्णू काळुसे यांनी पार पाडली.