Brahmapuri Farmers Memorandum To Tehsildar  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | उन्हाळी धान लागवडीला परवानगी द्या; ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

वैयक्तिक विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर सिंचन करण्यास हरकत नसल्याची तहसीलदारांची तोंडी सूचना; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कमी क्षेत्रात लागवडीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Brahmapuri Farmers Memorandum To Tehsildar

चंद्रपूर: उन्हाळी धान पिकाच्या लागवडीचा हंगाम जवळ येत असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक विहीर आणि बोअरवेलच्या माध्यमातून सिंचन करून उन्हाळी धानाची लागवड करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार ब्रह्मपुरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी वैयक्तिक विहीर व बोअरवेलमधील पाण्याचा वापर करून उन्हाळी धानाची लागवड करण्यास शासनाची हरकत नसल्याची तोंडी सूचना तहसीलदारांनी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पाणीटंचाई लक्षात घेऊन कमी लागवडीचे आवाहन

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर किंवा बोअरवेल आहे, अशा शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याच्या आधारे उन्हाळी धानाचे पीक घेण्याची मुभा असावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. यावर तहसीलदारांनी वैयक्तिक जलस्रोतांमधून सिंचनासाठी पाण्याचा उपसा करून धान लागवड केल्यास शासनाची कोणतीही हरकत नसल्याचे तोंडी सांगितल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.

मात्र, आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विद्युत विभागाकडून लोडशेडिंगचे प्रमाण वाढविले जाऊ शकते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी दरवर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करावी, अशी सूचनाही करण्यात आली.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, राम मोहन ब्राडिया सर, केशव करंबे, सोमेश्वर उपासे, पुष्पाकर बांगरे सर, सुदाम भागडकर, मधुकर प्रधान, माणिक मेश्राम यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

वैयक्तिक जलस्रोतांच्या आधारे उन्हाळी धानाची लागवड करण्यासंदर्भात प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT