घुग्घूस शहरापर्यंत लायड्स मेटल प्रकल्पासाठी आयरन स्लरी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू Pudhari
चंद्रपूर

Tree Felling Chandrapur | आयरन स्लरी पाइपलाइनसाठी सात वर्षे जपलेल्या शेकडो झाडांची कत्तल; परवानग्यांबाबत प्रश्नचिन्ह

भोयेगाव–धानोरा फाटा मार्गावरील प्रकार; जेसीबीच्या खोदकामामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी,

पुढारी वृत्तसेवा

Bhoyegaon Dhanora Iron Slurry Pipeline

चंद्रपूर : एकीकडे शासनाकडून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे सात वर्षे संगोपन करून १५ ते २० फूट उंच झालेली शेकडो झाडे काही तासांत जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. कोणसरी ते घुग्घूस शहरापर्यंत लायड्स मेटल प्रकल्पासाठी आयरन स्लरी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याच कामासाठी भोयेगाव ते धानोरा फाटा मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामाच्या मार्गात आलेली झाडे उखडण्यात आल्याचा आरोप होत आहे.

सात वर्षांच्या मेहनतीवर काही तासांत पाणी

भोयेगाव ते धानोरा फाटा मार्गाच्या दुतर्फा सुमारे सात वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली होती. या झाडांना टँकरद्वारे नियमित पाणी देत त्यांचे संगोपन करण्यात आले. सात वर्षांच्या मेहनतीनंतर ही झाडे आता १५ ते २० फूट उंच झाली होती. मात्र, आयरन स्लरी पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे यातील अनेक झाडे जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्यायी मार्गाचा विचार झाला का?

पाइपलाइन टाकताना ही झाडे वाचविण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच झाडे तोडण्यासाठी अथवा हटविण्यासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबतही नागरिकांकडून माहिती मागितली जात आहे. वर्षानुवर्षे जपलेल्या झाडांचे अशा प्रकारे नुकसान होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका काय?

सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गडचांदूर कार्यालयाच्या हद्दीत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला या प्रकाराची माहिती आहे का, झाडे वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, तसेच झाडे हटविण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी संबंधित विभाग आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT