Ganja Seized (File Photo)
चंद्रपूर

Chandrapur Ganja Seized | भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई: २ किलो गांजासह महिला ताब्यात; १.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी गांजासह मोपेड व मोबाईल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

Cannabis Seized Bhadrawati

चंद्रपूर : चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने मोपेडवरून गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका महिलेला भद्रावती पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी सावधगिरीने करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गांजासह मोपेड व मोबाईल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पाळत ठेवण्यात येत असताना, चंद्रपूरकडून भद्रावतीकडे एका हिरव्या रंगाच्या सुझुकी मोपेडवरून एक महिला अमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सायवन रोडवर पथकासह सापळा रचला.

संशयित महिला मोपेडवरून येताच पोलिसांनी तिला अडवून वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्या ताब्यातील दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. दोन्ही पुड्यांमध्ये अनुक्रमे १ किलो १० ग्रॅम आणि १ किलो २६० ग्रॅम, असा एकूण २ किलो ३६० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासोबतच गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची सुझुकी मोपेड (क्रमांक MH 34 CS 1752) आणि १५ हजार रुपये किमतीचा जुना निळ्या रंगाचा आयफोन-११ असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यामुळे या कारवाईत एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला गांजा कोठून आणण्यात आला आणि तो भद्रावती परिसरात कोणाला पुरविला जाणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन एस. खेत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सपोनि. संजय मिश्रा, पोउपनि. संतोष केदार, सपफौ. महेंद्र यांच्यासह पोलीस अंमलदार गोपाल, देवानंद, प्रशांत, अनुप, धर्मराज, योगेश, संतोष, खुशाल, किरण, नितीन तसेच महिला पोलीस अंमलदार रागिनी, पूजा आणि मोनाली यांचा सहभाग होता.

भद्रावती परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT