Chandrapur Fire News 
चंद्रपूर

Chandrapur Fire News : बालाजी वॉर्डात फटाक्यामुळे घराच्या दुसऱ्या माळ्याला भीषण आग!

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात ९ वाजेच्या सुमारास किशोर भामकर यांच्या घरावर फटाक्याची ठिणगी पडल्याने दुसऱ्या माळ्याला आग लागली. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास किशोर भामकर यांच्या घराबाहेर लहान मुले फटाके फोडत होती. त्याच वेळी मुलांनी फोडलेला एक फटाका उडून थेट भामकर यांच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर जाऊन पडला. काही वेळातच दुसऱ्या माळ्यावर ठेवलेल्या साहित्याने पेट घेतला आणि आगीने रौद्ररुप धारण केले.

घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या काही वेळात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

या घटनेत घराच्या दुसऱ्या माळ्यावरील साहित्याचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असून कुणाच्याही जीवाला हानी पोहोचलेली नाही. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे ही आग शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले, ज्यामुळे बालाजी वॉर्डातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT