Rajiv Gandhi Engineering College Hostel Food Quality  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News: वसतिगृहातील जेवणात झुरळ, अळ्या, वरणात किडे: विद्यार्थ्यांचा भोजनावर बहिष्कार

Chandrapur Latest News: झुरळ, अळ्या, वरणात किडे; उंदराची विष्ठा व अवशेष आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Rajiv Gandhi Engineering College Hostel Food Quality

चंद्रपूर : बाबूपेठ येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील भोजनाच्या दर्जावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जेवणात झुरळ, नाश्त्यामध्ये मेलेल्या अळ्या, वरणात किडे तसेच आता उंदराची विष्ठा आणि मेलेल्या उंदराचे अवशेष आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मागील २४ तासांपासून भोजनावर बहिष्कार टाकत महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहातील भोजनाच्या दर्जाबाबत गेल्या काही दिवसांपासून तक्रारी केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या ताटात झुरळ आढळल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नाश्त्यामध्ये मेलेल्या अळ्या आणि वरणामध्ये किडे आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या घटनांनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

उंदराची विष्ठा व अवशेष आढळल्याचा दावा

आजच्या भोजनामध्ये उंदराची विष्ठा तसेच मेलेल्या उंदराचे अवशेष आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केल्याने संताप आणखी वाढला. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी भोजन नाकारत आंदोलन सुरू केले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित सुधारणा झाल्या नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्याची बाजू घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार बदलण्यात यावा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार भोजन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोपांबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. वसतिगृहात दररोज सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थिनींसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जात असल्याने एखादा किडा आढळणे ही सामान्य बाब असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोप आणि प्रशासनाचे स्पष्टीकरण यामुळे वसतिगृहातील भोजनाच्या दर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT