चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात राहत्या घरातून कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम आणि कंडोमचा बॉक्स असा एकूण २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्चच्या मागील परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर विशेष पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून कारवाईची आखणी केली.
महिला पंच, सोशल वर्कर तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान मुस्कान शफीक शेख (४०) आणि रेशमा ऊर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (४५) या दोघी संगनमत करून महिलांकडून कथित वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली असून, घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम आणि कंडोमचा बॉक्स असा २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे कर्मचारी आणि सोशल वर्कर्स सहभागी झाले होते.