चंद्रपूर

चंद्रपूर : संतप्त आंदोलनकर्त्या आदिवासींचा वनविभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल!

निलेश पोतदार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा पोंभूर्णा येथील इको पार्क मधील आदिवासी संस्कृतीची अवहेलना केल्याप्रकरणी आदिवासी बांधवांनी मागील चार दिवसांपून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने (शुक्रवार) उग्ररूप धारण केले. आंदोलकांनी टोकाची भूमिका घेत वनविभागाच्या कार्यालयावरच हल्लाबोल करून कार्यालयाची तोडफोड केली. पोलीस बंदोबस्तात वन कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढावे लागले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा येथे काही वर्षांपूर्वी इको पार्कची निर्मिती करण्यात आली, परंतु काहीच दिवसांत या पार्कची अवस्था दयनीय झाली. इको पार्कमध्ये असलेल्या आदिवासी संस्कृती घडविणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या, पण या वास्तूंची तोडफोड झाली. तसेच आदिवासीं समाजाचा झेंडा काढून फेकण्यात आला. हे दुष्कृत्य वन विभागाने केले, असा आरोप करीत संतप्त आदिवासी बांधवांनीं मागील चार दिवसांपासून आंदोलन छेडले आहे.

वनविभागाच्या विरोधात आदिवासी बांधवांनी शेकडोंच्या संख्येत वन विभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच ठिकाणी त्यांनी रात्रही काढली. अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोंभुर्ण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोंभुण्यातील जंगल हे ताडोबा अभयारण्यासोबत जोडले आहे. कन्हाळगाव अभयारण्याचा भाग असलेल्या पोंभुर्ण्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. येथील जंगलात वाघांची संख्याही लक्षणीय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मिती करण्यात आली. या पार्कला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले, पण सध्या या पार्कची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पोंभुर्णा येथील इको पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या. या वास्तू बघून इथे येणाऱ्या पर्यंटकांना संस्कृतीचे दर्शन होत होते, पण वन विभाग प्रशासनाने या वास्तूची योग्य रीतीने देखभाल न करता उलट तोडफोड केली. एवढेच नव्हे तर या ठिकाणी असलेला आदिवासी समाजाचा झेंडा त्यांनी काढून फेकला, असा आरोप आदिवासीं बांधवांनी करून चार दिवसांपासून वनविभागाचे कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

यासाठी मागील काळात आदिवासी बांधवांनी मोठे आंदोलन उभारले होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आदिवासी समाजबांधवांनी इको पार्कच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी पोंभुर्ण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. समाजातील महिला, पुरुष, बच्चे कपंनी या आंदोलनात सहभागी झाले. रात्रभर ही मंडळी याच ठिकाणी ठाण मांडून बसली होती. अजूनही त्यांचे आंदोलन सुरू आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, इको पार्कला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, आदी त्यांनी मागण्या रेटून धरल्या आहेत.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून आदिवासींची थट्टा केल्या जात असल्याचा आरोप करीत संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. यादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी नमती भूमीका घेतल्यामुळे अनुचित प्रकार टळला. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क मध्ये जाऊन आदिवासींचा आराध्य दैवताचा झेंडा विधिवत पूजा करून लावला लावला आहे. आंदोलनकर्ते विविधय मागण्यांना घेऊन अडून बसले आहेत. हा तिढा प्रशासन कसा सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी चर्चा केली, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. बिगडत चाललेली परिस्थिती पाहता ३०० हून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT