Akapur Postcard Agitation Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Farmers Protest | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आकापूरमध्ये पोस्टकार्ड आंदोलन; मुख्यमंत्र्यांना पाठविली २०० पोस्टकार्ड

धान बोनस, पीक विमा, २४ तास वीजपुरवठ्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Akapur Postcard Agitation

चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी संघटनाच्या वतीने बुधवारी (११ नोव्हेंबर) पोस्टकार्ड आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना २०० पोस्टकार्ड पाठवून शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकापूर येथील पोस्ट ऑफिसमधून ही पोस्टकार्ड पाठविण्यात आली.

धान उत्पादक शेतकरी सध्या विविध आर्थिक आणि कृषिविषयक समस्यांना सामोरे जात आहेत. शासनाकडे वारंवार मागण्या करूनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी संघटनेने पोस्टकार्ड आंदोलनाचा मार्ग अवलंबला. सन २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन्ही वर्षांचा धान बोनस तातडीने देण्यात यावा, धान पिकाचा पीक विमा मंजूर करावा, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रलंबित कृषी वीज जोडण्या तातडीने देण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्या या पोस्टकार्डच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने प्रसिद्ध कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांचीही शासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली.

गावागावांतील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनदरबारी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेच्या भूमिकेतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT