Chandrapur Air Pollution, AI Photo 
चंद्रपूर

Chandrapur Air Pollution : चंद्रपूरच्या हवेचा श्वास कोंडला! नऊ दिवसांत AQI ५७ वरून १९० वर

१ ते ५ नोव्हेंबरदरम्यान समाधानकारक असलेली हवेची गुणवत्ता ६ नोव्हेंबरपासून खालावली, वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : औद्योगिक प्रदूषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील हवेची गुणवत्ता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून झपाट्याने खालावत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान ५७ वर असलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ९ नोव्हेंबर रोजी थेट १९० वर पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसांत प्रदूषणाच्या पातळीत झालेली ही वाढ चिंताजनक असून, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत चंद्रपूरमधील हवेची गुणवत्ता तुलनेने चांगली होती. या काळात AQI ५७ इतका नोंदविण्यात आला. मात्र, ६ नोव्हेंबरपासून हवेच्या गुणवत्तेत घसरण होण्यास सुरुवात झाली. या दिवशी AQI १३४ वर पोहोचला. त्यानंतर ७ नोव्हेंबरला १२१, ८ नोव्हेंबरला १५० आणि ९ नोव्हेंबरला १९० अशी नोंद झाली. विशेष म्हणजे, ८ आणि ९ नोव्हेंबरदरम्यानही प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे.

हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसनाचे विकार असलेले रुग्ण आणि दमा असलेल्या व्यक्तींना आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता आहे. डोळ्यांची जळजळ, खोकला, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

चंद्रपूर शहर आणि परिसरात औद्योगिक प्रकल्प, कोळशाची वाहतूक, वाहनांचा धूर, रस्त्यांवरील धूळ तसेच बांधकामांमधून निर्माण होणारे धूलिकण हे प्रदूषणाचे संभाव्य स्रोत मानले जातात. मात्र, सध्याच्या वाढीमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी हवेच्या गुणवत्तेचे आणि प्रदूषण स्रोतांचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, नियमित पाणी फवारणी, धूळ नियंत्रण, औद्योगिक उत्सर्जनावर देखरेख आणि प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा चंद्रपूरकरांना प्रदूषित हवेत श्वास घेण्याची वेळ येणार आहे.

आकडेवारीचा आलेख :

दिनांक           | AQI | air quality index

१ ते ५ नोव्हेंबर | ५७  |

६ नोव्हेंबर      | १३४ |

७ नोव्हेंबर      | १२१ |

८ नोव्हेंबर      | १५० |

९ नोव्हेंबर      | १९० |

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT