Chandrapur Air Pollution Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Air Pollution | चंद्रपूरला एप्रिलमध्ये प्रदूषणाचा विळखा: ‘गुड’ श्रेणीतील एकही दिवस नाही; ३० पैकी २६ दिवस ‘मॉडरेट’ श्रेणीत

उष्णतेचा वाढता प्रभाव, धुळीकण, वाहतूक व कचरा ज्वलन ठरले प्रमुख कारण

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur AQI April

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात एप्रिल महिन्यात प्रदूषणाची तीव्रता चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे समोर आले आहे. ३० दिवसांपैकी तब्बल २६ दिवस ‘मॉडरेट’ (मध्यम प्रदूषण) श्रेणीत नोंदवले गेले असून, एकही दिवस ‘गुड’ (चांगला) श्रेणीत आढळलेला नाही. वाढती उष्णता, वाहतूक, कचरा ज्वलन आणि धुळीकणांमुळे हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) पाहता, बहुतांश दिवस प्रदूषित श्रेणीत असल्याचे दिसून आले.

० ते ५० AQI (चांगला) : एकही दिवस नाही

५१ ते १०० AQI (समाधानकारक) : फक्त ४ दिवस

१०१ ते २०० AQI (मॉडरेट) : तब्बल २६ दिवस

२०१ पेक्षा जास्त (खराब ते गंभीर) : एकही दिवस नाही

खुटाळा परिसरातही प्रदूषणाची स्थिती सारखीच असून, काही दिवस अत्यंत प्रदूषित स्थितीची नोंद झाली आहे.

धुळीकणांचा सर्वाधिक प्रभाव

प्रदूषण निर्देशांक मोजताना ३ ते ८ प्रमुख प्रदूषकांचा विचार केला जातो. त्यामध्ये PM10 (धुळीकण), PM2.5, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया आणि लीड यांचा समावेश असतो.

एप्रिलमध्ये चंद्रपूरमध्ये विशेषतः PM10 (धुळीकण) हा घटक २६ दिवस आढळून आला, तर PM2.5 आणि ओझोन केवळ २ दिवस नोंदवले गेले. यावरून धूळ, कचरा जाळणे आणि वाहनांचा धूर हे प्रदूषण वाढीचे प्रमुख घटक असल्याचे स्पष्ट होते.

प्रदूषण वाढीची कारणे

शहरातील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे. प्रमुख कारणे म्हणजे थर्मल पॉवर प्लांट व उद्योगधंदे, वाहनांची वाढती संख्या व त्यातून निघणारा धूर, रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम कामे, कचरा जाळणे व बायोमास बर्निंग, घरगुती इंधन ज्वलन दिसून येत आहेत.

शहराच्या विकासासाठी सुरू असलेली बांधकामे आणि रस्त्यांची कामे यामुळेही धुळीचे प्रमाण वाढत आहे.

आरोग्यावर गंभीर परिणाम

प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेसोबत प्रदूषणाचा दुहेरी परिणाम जाणवत आहे.दमा, ब्रॉन्कायटिस, टीबीसारखे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका,हृदयविकार आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता असून आधीपासून आजारी असलेल्या रुग्णांसाठी अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे.

उष्ण वाऱ्यांमुळे काही प्रमाणात प्रदूषके विखुरली जात असली तरी एकूण स्थिती चिंताजनकच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना गरजेच्या

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे उपाय :

वृक्षारोपण व हरित क्षेत्र वाढविणे,

सायकल व सार्वजनिक वाहतूक वापर वाढवणे,

इलेक्ट्रिक (बॅटरीवर चालणाऱ्या) वाहनांचा वापर,

कचरा जाळण्यास बंदी व कडक अंमलबजावणी,

उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रण उपायांची सक्ती,

स्मॉग टॉवर, फॉग मशीन आणि कृत्रिम पावसासारखे उपाय तात्पुरते ठरतात; मात्र दीर्घकालीन नियोजन आणि कठोर अंमलबजावणी केल्यासच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.

चंद्रपूर शहरातील एप्रिल महिन्यातील प्रदूषणाचा आकडा हा भविष्यासाठी इशारा देणारा आहे. ‘गुड’ श्रेणीतील एकही दिवस नसणे ही गंभीर बाब असून, वेळेत उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT