चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे, प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूची विक्री, गौण खनिजांची चोरी तसेच अमली पदार्थांच्या व्यवहारांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी रविवारी विविध ठिकाणी एकाचवेळी धडक कारवाया केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सिंदेवाही, मूल, रामनगर, भद्रावती आणि चंद्रपूर शहर परिसरात छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत शाम परमानंद छत्रवाणी (रा. सिंदेवाही) याच्याकडून सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील जयसुख ठक्कर (रा. बल्लारपूर) हा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या कारवाईत नरेश करमचंद भवानी (रा. सिंदेवाही) याच्याकडून तब्बल १३ लाख ७६ हजार रुपयांचा विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला.
मूल तालुक्यातील राजोली येथे आरोपी दिलीप ईश्वर शेंडे (वय ५३) याच्याकडून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखू व पानमसाला असा सुमारे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत सिद्धांत माधव गोंडाणे आणि मोहम्मद अखिल शकील शेख या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सुगंधीत तंबाखू व हुक्का शिशाचा तब्बल १९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वासिम झिमरी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, भद्रावती तालुक्यातील मौजा चंदणखेडा चोरा नाला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा पथकाने अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉलीसह दोन ब्रास रेती असा सुमारे २१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सुरज गजानन जिवतोडे आणि निलेश संतोष गोहणे यांना ताब्यात घेण्यात आले असून विकास ईश्वर धांडे हा आरोपी फरार आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर बंगाली कॅम्प परिसरात अमली पदार्थांविरोधातही कारवाई करण्यात आली. आरोपी आदित्य वासुदेव मडावी (वय २६) याला गांजा सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून गांजा सेवनाचे साहित्य जप्त करण्यात आले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात विविध पथकांनी पार पाडल्या.