Chandrapur Accident 
चंद्रपूर

Chandrapur Accident | वरोरा-चंद्रपूर मार्गावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

बोपापूरच्या सौरभ व अजित हिरादेवे यांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा-चंद्रपूर मार्गावर लगान बारजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सौरभ रमेश हिरादेवे (वय २७) आणि अजित पंढरी हिरादेवे (वय ३०, दोघेही रा. बोपापूर, ता. वरोरा) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आणि अजित हे दोघे दुचाकीने वरोरा येथे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आले होते. काम आटोपून ते सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान दुचाकीने बोपापूरकडे परत जात होते. याचवेळी लगान बारजवळ चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सौरभ हिरादेवे यांना मृत घोषित केले. अजित यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, भद्रावतीजवळ त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे बोपापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्र. ९८७/२०२६ असून, मोटार वाहन अधिनियम कलम १३४, १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (ब) आणि २८१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी वरोरा पोलीस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT