चंद्रपूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा येाजनांच्या कामांचे बिले काढण्यासाठी 4 लाख 20 हजारांची लाच मागितली होती. ही लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आलेले चंद्रपूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व एका कंत्राटी परिचराला लाचलुचपत विभागाने आज शुक्रवारी न्यायायात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही 3 दिवसाची 13 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कार्यकारी अभियंत्याला अटक केल्यानंतर त्यांच्या घरी केलेल्या चौकशीत 7 लाख 99 हजार 510 रूपयाची रोकड सापडली आहे. लाचलुचपत विभाग पुन्हा 3 दिवस या लाच प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.
"जल जीवन मिशन" च्या अंतर्गत तालुक्यात २३ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांचे कामे केली. त्यापैकी १० गावांतील नळ पाणी पुरवठा योनांचे कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते. त्यांपैकी 5 गावांचे कामांचे एकूण ४३ लाख रुपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढून दिलेले व उर्वरित बिले काढून देण्याकरिता कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी ४ लाख रूपयाची मागणी केली होती. सदर लाचेची रक्कम कार्यालयातील वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले होते. गुंडावार यांनी स्वत:करीता २० हजार रूपये असे .एकूण 4 लाख 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, लाचलुचपत विभागाने काल गुरूवारी (१० एप्रिल २०२५) रोजी केलेल्या सापळा कारवाई करत कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, कंत्राटी परिचर मो. मतीन फारून शेख तिघांनाही लाच घेताना ताब्यात घेतले. तिघांच्याही विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.