चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 च्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये संपूर्ण कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) व प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी जिल्ह्याला प्राप्त झाली असून एकूण 3747 शेतकरी पात्र ठरले आहेत. यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2962 शेतकरी तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 785 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये राज्यातील एकूण 25.81 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 53 हजार 473 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर 2 लाखाचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. एकवेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची यादी गावपातळीवर ग्रामपंचायत तसेच बँकेच्या शाखेत व विकास संस्थेच्या शाखेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, 31 मार्च 2026 अखेरच्या थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता (ओटीएस) प्रमाणे थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम व शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमुद आहे.
शेतकऱ्याने प्रसिद्धी यादीतील तपशील तपासून त्यांच्या हिश्याची 2 लाखावरील रक्कम संबंधीत बँकेत भरणा करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखाते एकाच बँकेत आहे, अशा शेतकऱ्यांनी नमूद केलेली रक्कम संबंधीत बँकेच्या कर्जखात्यात भरणा करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम त्यांच्या कोणत्याही कर्ज खात्यात भरण्याची सुविधा आहे. याबाबत शेतकऱ्यांनी योग्य ती माहिती घेऊन बँकेत रक्कम जमा करावी.
शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या 2 लाखावरील कर्जाची रक्कम भरावयाची अंतिम मुदत 31 मार्च 2027 पर्यंत राहील. यादीत नमूद असलेल्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरणा केल्याची अद्ययावत माहिती दर शुक्रवारी बँकेमार्फत पोर्टलवर अपलोड केली जाईल. बँकेने माहिती पोर्टलवर अपलोड केल्याचे शेतकऱ्यास कळवायचे आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम संबंधीत बँकेत भरली असल्यास अशा शेतकऱ्यांना थकबाकीचे अद्ययावतीकरण झाल्याच्या तीन दिवसानंतर आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण केले आहे, व बँकेत त्यांच्या हिश्श्याची भरलेली रक्कम भरल्यानंतर 2 लाखाचा लाभ हस्तांतरीत करण्यात येईल. शासनाने 2 लाखाची रक्कम वर्ग केल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे. एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या यापुढेही प्रसिद्ध करण्यांत येणार आहे, असे उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.