Chandrapur Fraud News | चंद्रपुरात ३७१७ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कंपनीचा संचालक अटकेत! 
चंद्रपूर

Chandrapur Fraud News | चंद्रपुरात ३७१७ कोटींच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी कंपनीचा संचालक अटकेत!

VUENOW MARKETING SERVICES LIMITED मार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, ठेवी परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना अर्ज करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर  : इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील “क्लाउड पार्टिकल” खरेदी करून भाड्याने देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या संचालकाला चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कंपनीच्या विविध बँक खात्यांमधून तब्बल ३७१७ कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले आहे.

इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील “क्लाउड पार्टिकल” खरेदी करून ते भाड्याने देऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या संचालकाविरोधात चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कंपनीचा मुख्य संचालक सुखवेदरसिंग हकमसिंग खरौर (रा. मोहाली, पंजाब) याला ११ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ६१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी संचालकाने गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या १४ बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून एकूण ३७१७ कोटी ३० लाख ८२ हजार ९४७ रुपये इतकी प्रचंड आर्थिक उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ तसेच महाराष्ट्र शासनाच्या २५ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कंपनीचे ICICI बँकेतील २८ कोटी ९९ लाख ११ हजार ३४९ रुपये इतके खाते गोठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगांवकर करत आहेत. तपास पथकात पोलीस हवालदार सुरेश धाडसे, प्रभाकर तलांडे, उज्वल साखरकर आणि विजू झरकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या “क्लाउड पार्टिकल” योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपली ठेवी परत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेत येऊन अर्ज (फॉर्म) भरावा, असे आवाहन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगांवकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT