Tiger Attack Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | पद्मापूर चक जंगलालगत वाघाचा हल्ला; रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

ब्रम्हपुरी वनविभागाची तातडीने कारवाई; ट्रॅप कॅमेरे, लाईव्ह कॅमेरे बसवून गस्त वाढवली, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Padmapur Chak Forest Youth Killed By Tiger

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत भुज उपक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात गुरुवारी ( दि. ९ ) दुपारी वाघाच्या हल्ल्यात एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रानभाजी तोडण्यासाठी जंगलालगतच्या कुरणात गेलेल्या अनिल भास्कर दिवटे (रा. बल्लारपूर) यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने शोधमोहीम आणि सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पद्मापूर चक जंगलालगत वाघाचा भीषण हल्ला

दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भुज उपक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मौजा पद्मापूर चक जंगलाला लागून असलेल्या कुरण गट क्रमांक २१ मध्ये रानभाजी गोळा करण्यासाठी गेलेल्या अनिल भास्कर दिवटे (वय ३०, रा. बल्लारपूर) यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दिवटे हे दुपारच्या सुमारास जंगलालगतच्या कुरणात रानभाजी तोडत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालत मानेवर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मानेवर दात आणि नखांच्या गंभीर जखमा

घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सविस्तर मौका पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यादरम्यान मृताच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दात व नखांच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच, हल्ला झालेल्या ठिकाणी त्यांनी गोळा केलेल्या रानभाजीची पिशवीही पडलेली आढळली. या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे वाघानेच हल्ला केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्रम्हपुरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) एम. बी. गायकवाड, दक्षिण ब्रम्हपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही. सोनडवले, क्षेत्र सहाय्यक एस. एम. लोणारे, पद्मापूरचे नियतक्षेत्र वनरक्षक व्ही. एम. आदे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस उपस्थित होते. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जंगलालगतच्या भागात जाण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजना

घटनेनंतर वनविभागाने संबंधित परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे बसवले आहेत. तसेच, वन कर्मचाऱ्यांकडून नियमित गस्त वाढविण्यात आली असून वाघाचा माग काढण्याचे काम सुरू आहे. वन प्रशासनाने नागरिकांना जंगलात किंवा जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचे, रानभाजी, सरपण किंवा अन्य वनउपज गोळा करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT